मातंग समाज बांधवांकडुन अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वागत
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या योजनेमधुन तेल्हारा तालुक्यातील अकोली रुपराव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी दोन गुंठे जागा देण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यासाठी मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेतली.
तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथे अनेक वर्षापासून मातंग समाजाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी असलेला भूखंड येथील स्थानिक राजकारणाच्या दबावामुळे प्रलंबित होता. या समाज मंदिराच्या जागेसाठी मातंग समाज बांधव संघर्ष करत होते. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा मातंग समाज नेते गजानन तायडे यांनी पुढाकार घेऊन वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अॅड. संतोष राहाटे, बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासोबत सदर बाबीसंदर्भात चर्चा केली असता मातंग समाज बांधवांचा असलेला संघर्षाचा विचार करुन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापतींना रखडलेली दोन गुंठे जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी देण्याचे आदेश दिले. यासाठी गुरुवारी अकोली रुपराव येथील मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी मातंग समाजाचे युवा अध्यक्ष सागर तायडे, मोहन अंजनकर, विनायक तायडे, कृष्णा तायडे, ओम तायडे, युवराज तायडे, आकाश तायडे, वेदांत तायडे, गोपाल नावकर, संतोष खंडारे यांच्यासह उपसरपंच लक्ष्मण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सागर लासुकर, त्र्यंबक तायडे, मातंग समाज नेते गजानन तायडे, गजानन दांडगे, संजय बोदळे, प्रभाकर बोरकर, मोहन अंजनकर, गंगाधर सावळे, मातंग समाजाच्या नेत्या मयुरी मोरे, गोपाल अंजनकर आदी समाजबांधव उपस्थित होते.