अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अकोला जिल्ह्यात महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ९ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या सभेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. “भाजप आणि मनुवादी शक्तींना धडा शिकवायचा असेल, तर तो केवळ मतदानातूनच शक्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रस्थापितांमुळे अकोल्याचा विकास रखडला
सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, प्रस्थापित पक्षांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे अकोला शहराचा विकास पूर्णपणे रखडलेला आहे. शहरात बदल घडवणे आता काळाची गरज आहे. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे, परंतु प्रशासन त्यात अपयशी ठरले आहे.

गरिबांच्या हक्कासाठी ‘वंचित’ ठाम
अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. घरांचे नियमितीकरण न करता अतिक्रमणाच्या नावाखाली गरिबांना बेघर केले जात आहे. या अन्यायाविरुद्ध केवळ वंचित बहुजन आघाडीच ठामपणे रस्त्यावर उतरून लढत आहे, असे त्यांनी नमूद केले.
तसेच दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये रोजगाराच्या संधींचा अभाव असून, मुस्लिम समाजाचा केवळ ‘व्होट बँक’ म्हणून वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी या भव्य जाहीर सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.






