नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दीक्षाभूमीवरील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने नागपूरच्या दीक्षाभूमीवर येणार आहेत. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी येथे होते.
मात्र, अलिकडच्या मुसळधार पावसामुळे दीक्षाभूमी संकुलातील पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरात पाणी साचणे, रस्त्यांची वाईट अवस्था, स्वच्छतेचा अभाव तसेच तात्पुरत्या निवास-व्यवस्थेतील कमतरता यामुळे भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणताही विलंब न करता आवश्यक ती दुरुस्ती व व्यवस्थापन तातडीने करावे, अन्यथा गर्दीच्या वेळी गंभीर अडचणी उद्भवतील, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.