अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव–२०२६ च्या निमित्ताने अकोला येथे भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो अकोला’, लाखोंची जनता, तिचा एकच नेता’ आणि ४२ वर्षांची अखंड परंपरा या घोषवाक्यांसह आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव बुधवारी, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अकोला येथे पार पडणार आहे.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक आणि वैचारिक परंपरेचे स्मरण करून देणाऱ्या या महोत्सवात भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या ४२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी धम्म मेळाव्याच्या माध्यमातून बौद्ध समाज एकत्र येणार आहे.
या महोत्सवासाठी अकोला येथे लाखोचा जनसागर उसळणार असून येथे मोठ्या संख्येने नागरिक, बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी विचारांचे अनुयायी उपस्थित राहणार असून धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





