वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे राजकारण शक्य नाही : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर
मुंबई : नवी दिल्ली येथून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आलेल्या एका महत्त्वपूर्ण फोननंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाकडून एआयसीसीचे (AICC) सेक्रेटरी श्री. वेंकटेश आणि त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेस मधील काही महत्त्वपूर्ण पदाधिकारी दादर येथील राजगृहावर ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी आले होते.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर तसेच पक्षासाठी धोरणात्मक काम करणारे सुमित आनंद उपस्थित होते. बैठकीदरम्यान ॲड. आंबेडकर आणि श्री. वेंकटेश हे आतल्या खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा करत होते.
या चर्चेनंतर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीस काही प्रस्ताव देण्यात आले असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. मात्र, हे प्रस्ताव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहेत की राष्ट्रीय पातळीवरील राजकीय समीकरणांशी संबंधित आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
या संदर्भात ॲड. आंबेडकर यांच्याशी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नसून, याबाबतची भूमिका ते योग्य वेळी स्पष्ट करतील, असेही डॉ. पुंडकर यांनी सांगितले.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाला आता हे उमगू लागले आहे की, भाजपच्या विरोधात एकट्याने लढा देणे शक्य नाही. भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणतेही राजकारण शक्य नाही. वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अपरिहार्य भाग असून, तिच्याशिवाय कोणताही गैर-भाजप पक्ष राज्यात टिकू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.






