सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले होते. गोसावी समाजाला जातीचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पिण्याचे पाणी, रस्ता, वीज, गटारी, शाळा यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने या निवेदनातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक जिल्हाध्यक्ष दीपक पराध्ये, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व गोसावी समाजातील नागरिक उपस्थित होते.
निवेदनानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तत्काळ दखल घेत संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे आदेश देऊन आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परिणामी, २२ ऑगस्ट रोजी गोसावी वस्ती येथे विशेष शिबिर भरवून समाजाच्या कागदपत्रांसह विविध प्रश्नांचा निपटारा करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या प्रयत्नाला गोसावी समाजाच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.