ॲड. प्रकाश आंबेडकर : ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे
जालना : आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज भेट दिली. यावेळी प्रा. हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन पाणी घेतले.
या वेळी ॲड. आंबेडकर म्हणाले की, नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके या दोघांचे ओबीसींचे आरक्षण आबाधित राहावं आणि त्यांच्यातून कोणाला आरक्षण देवू नये या मागणीसाठी त्यांनी उपोषण चालू केले आहे. तसेच त्यांनी पाणी घ्यायला पाहिजे. त्यांच्या या विनंतीला मान देत हाके आणि वाघमारे यांनी पाणी घेतले.
शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. जिल्ह्याजिल्ह्यांत आंदोलन सुरू आहे आणि लोक मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सामाजिक सलोखा राहिला पाहिजे या दृष्टीने पावलं टाकायला पाहिजेत पण शासनाकडून तशी पावले पडताना दिसत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनेकवेळा महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आलेला आहे. बेरोजगारी यामध्ये भर घालत आहे. आपल्याला जगण्यासाठी साधन मिळालं आहे त्याच्यावरती हल्ला होतोय की काय ? याची चिंता ओबीसी समूहाला आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना भूमिका घ्यायला लावली पाहिजेत आणि त्यातून मार्ग काढला पाहिजेत असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
आमची भूमिका आम्ही आधीच जाहीर केली आहे की, ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. ते मंडल आयोगाने निर्माण केले आहे. त्यावेळी अनेक मोर्चे निघाले होते आणि निकाल सुद्धा लागला होता, असे म्हणत त्यांनी मंडल आयोगाच्या इतिहासाची आठवण करून दिली. तसेच या प्रश्नात शासनाने ताबडतोब लक्ष घालावे, अशी विनंती करून ओबीसींचे आरक्षण ओबीसींचेच असायला हवे ही वंचितची भूमिका असल्याचे आंबेडकर यांनी अधोरेखित केले.