मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली. याबाबत ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.
परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी ५ जानेवारी रोजी अकोला येथे माझी भेट घेऊन तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात येणाऱ्या अडचणीविषयी माहिती दिली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या –
१. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे तसेच सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्यामुळे याची चौकशी न्यायालयाने करावी.
२. शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी.
३. अनेकजण सूर्यवंशी कुटुंबियांना त्रास देत आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
४. नवी मुंबईमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग झाला होता. पीडितांच्या कुटुंबियांना त्या जागेत राहायचं नाही, म्हणून त्यांनी त्यांची जागा सरकारला देऊन त्यांना नवीन ठिकाणी सरकारने स्थलांतर करावे. याबाबत धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.