मुंबई : वरळी विधानसभा क्षेत्रातील प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील एल्फिन्स्टन ब्रीज अखेर शुक्रवारी 12 सप्टेंबर रात्री 10.30 वाजता पाडण्यात आला. या निर्णयानंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले असून, रहिवाशांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विविध पक्षांचे आमदार उपस्थित राहिले. मात्र या ठिकाणी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात आमदार कालिदास कोळंबकर, महेश सावंत आणि प्रसाद लाड सहभागी झाले, त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, मुख्यमंत्र्यांनी पुढील आठ दिवसांत पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आश्वासनाची लेखी हमी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश सदस्य आकाश अशोक दोडके यांनी उपस्थित केला.
दोडके यांनी सरकार व विरोधक दोन्ही बाजूंना धारेवर धरत विचारले की, “वरळी–दादर परिसरातील नागरिकांचा प्रवास कसा सुरळीत होणार? रुग्ण KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी काय पर्यायी व्यवस्था आहे?”
या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की, पोद्दार हॉस्पिटल व कामगार हॉस्पिटलमध्ये KEM प्रमाणे ICU आणि Casualty विभाग लवकरच सुरू करण्यात येतील. तरीही, आमदारांनी दिलेली आश्वासने जर पूर्ण झाली नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा आकाश दोडके यांनी दिला.
या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र बडेकर, प्रभाग समन्वयक कपिल क्षीरसागर तसेच मनोज मर्चंडे उपस्थित होते.