नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बेसा येथे स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. सुजाता वालदेकर व नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रिन्स शामकुळे यांनी केले.
सरकारच्या धोरणांमुळे आधीच जनतेवर महागाई व करांचा बोजा वाढला असताना, आता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय हा जनतेवर अवाजवी आर्थिक भार टाकणारा असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देत स्मार्ट मीटरविरोधी नाराजी व्यक्त केली.
यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बेसा नगर पंचायतीला निवेदन सादर केले. “स्मार्ट मीटर हा जनतेला अजिबात मान्य नाही. याबाबतचा अहवाल तयार करून तो महावितरणला पाठवावा. आमच्या नगर पंचायत क्षेत्रात स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, हे स्पष्टपणे नमूद करावे. अन्यथा पुढच्या वेळी या पेक्षा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल,” असा ठाम इशारा निवेदनातून देण्यात आला.
या आंदोलनात राजहंस तिरपुडे, व्ही. एस. तोडेकर, उमेश गुडधे, एम. एन. वानखेडे, अनिता वानखेडे, वंदना सोनटक्के, लिना गायकवाड, शारदा रामटेके, कविता गाडगे, बागडे मामा, भुमेश टेभेंकर, आनंद ठाकुर, विशाल कसबे, प्रमोद गहलोत, प्रकाश सोनटक्के, गजानन ठाकरे, मंगला काळे, आरुणा कोल्हे, माया लोहकरे, वर्षा कांबले, रवीराज कुंभारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी जनचळवळ दिसून आली. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करून स्मार्ट मीटर योजना त्वरित मागे घेण्याची मागणी केली.