सांगली : पोलीस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन लढा देत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जाहीर अभिनंदन केले आहे.
सलगरे ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण सर्वप्रथम ॲड. आंबेडकर यांनी उघडकीस आणले. त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढा दिला. यामध्ये त्यांनी सरकारी आणि पोलीस प्रशासनाचे आरोपींना वाचवण्याचे षडयंत्र हाणून पाडले.
या प्रकरणाच्या यशस्वी लढ्यात ॲड. आंबेडकर यांनी स्वतः कोर्टात केस लढली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आरोपींवर गुन्हे दाखल झाले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी पूर्ण झाली.
एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. आंबेडकर यांनी हा लढा सातत्याने ज्वलंत ठेवला. त्यांच्या या कार्याबद्दल सलगरे ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विरोधी पक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.