मुंबई : देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या ‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन युवा आघाडीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून, निवडणूक घोटाळ्यासाठी वंचित आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हा निव्वळ अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.
राजेंद्र पातोडे यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले असले, तरी ते किंवा त्यांचे राज्यातील नेते न्यायालयात याचिका दाखल करायला का तयार नाहीत, असा सवाल पातोडे यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात एक कोटी ‘रहस्यमय मतदार’ असल्याचा दावा करूनही, काँग्रेसने केवळ आंदोलनात्मक मोहीम चालवली आणि न्यायालयाचा मार्ग का निवडला नाही, यावर त्यांनी बोट ठेवले.
मताची चोरी सत्ताधाऱ्यांकडूनच शक्य
निवडणुका मॅनेज करणे, बोगस मतदारांची नोंदणी करणे किंवा ईव्हीएममध्ये गैरव्यवहार करणे हे केवळ सत्ताधारी पक्षांनाच शक्य आहे. आम्ही तर केंद्रात किंवा राज्यात सत्तेत नव्हतो, मग आम्हाला ‘बी टीम’ कसे म्हटले जाते, असा सवाल पातोडे यांनी केला. ते म्हणाले, “वंचित आघाडीवर ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुद्दाम केला जातो, जेणेकरून बोगस मतदार, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यासारखे गंभीर मुद्दे लोकांसमोर येऊ नयेत.”
भाजप-काँग्रेस एकमेकांच्या ‘बी टीम’
राजेंद्र पातोडे यांनी पुढे म्हटले की, जर काँग्रेसकडे निवडणुकीतील गैरव्यवहाराचे पुरावे असतील, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली नाही? ईव्हीएमचा मुद्दा न्यायालयात आल्यास निकाल बदलतो, हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना चांगलेच माहीत आहे, म्हणूनच ते न्यायालयीन लढाई टाळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मते, भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कधी एकमेकांचे ‘बी टीम’ म्हणून काम करतात. पातोडे म्हणाले, “देशात आणि राज्यात भाजप कधी काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करते, तर कधी काँग्रेस भाजपची ‘बी टीम’ असते. बाकीच्या सर्व गोष्टी केवळ अंधश्रद्धा आहेत.”
निवडणुका जिंकणारी महायुती आणि हारणारी महाविकास आघाडी, यांच्या अपयशासाठी वंचित बहुजन आघाडीला जबाबदार धरणे हे चुकीचे असून, हे एक उघड सत्य आहे की निवडणुका मॅनेज पद्धतीने, बोगस मतदारांच्या आधारे होत असतील तर वंचित बहुजन आघाडीला ‘बी टीम’ म्हणणे हे तर्कहीन आहे, असे राजेंद्र पातोडे यांनी ठामपणे सांगितले.