ओडिशा : सध्या सोशल मीडियाच्या युगात ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी लोक काय करतील, याचा अंदाज लावता येत नाही. याचेच एक धक्कादायक उदाहरण नुकतेच ओडिशामध्ये समोर आले आहे. येथील एक २२ वर्षीय यूट्यूबर सागर टुडू हा मित्रांसोबत रील बनवण्यासाठी कोरापुट जिल्ह्यातील डुडुमा धबधब्याजवळ गेला होता. मात्र, रील शूट करत असताना पाण्याचा जोरदार प्रवाह वाढल्याने तो त्यात वाहून गेला.
शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आणि रील बनवणारा सागर आपल्या मित्रासोबत धबधब्याजवळ ड्रोनने शूटिंग करत होता. त्याचवेळी मुसळधार पावसामुळे माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडण्यात आले, ज्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.
हा धोका लक्षात न घेता सागर पाण्यात उभा राहून रील बनवत राहिला. पाहता पाहता तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकला. त्याचे मित्र आणि आजूबाजूला असलेले पर्यटक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की, क्षणात तो त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेला. हा थरारक आणि दुर्दैवी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माचकुंडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, अद्याप सागरचा शोध लागलेला नाही. या घटनेमुळे सोशल मीडियावर ‘कंटेंट’साठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. नेटकरी ‘रील कल्चर’वर संताप व्यक्त करत असून, “हे मूर्खपणाचे कृत्य आहे” आणि “नैसर्गिक आपत्तींमध्ये अशा ठिकाणी जाणे धोकादायक आहे,” अशा प्रतिक्रिया देत आहेत.