पुणे : राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुणे घाट परिसरासाठी पुढील २४ तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (State Emergency Operation Centre) माहितीनुसार, ‘Sachet’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या सात दिवसांत सुमारे २५३.७४ कोटी नागरिकांना हवामानाचे अलर्ट संदेश पाठवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये रत्नागिरीतील जगबुडी, रायगडमधील अंबा आणि ठाण्यातील काळू या नद्यांचा समावेश आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचीही स्थिती गंभीर आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि आंबेगाव तालुक्यात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, घोडनदीत अडकलेल्या पाच व्यक्तींना ‘आपदा मित्र’ दलाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
राज्याच्या किनारी भागांमध्येही समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा दिला आहे. वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती अजूनही कायम आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या विसर्गावर सतत लक्ष ठेवले जात आहे. कृष्णा नदीची पातळी वाढल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे, उजनी धरण पूर्ण भरल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.