हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावली असून, जमिनीही खरडून गेल्या आहेत.
गेल्या २४ तासांत सरासरी ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२०.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून एकूण ५८९.६ मिमी (११०.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट भागात झालेल्या पावसामुळे धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ओढे-नाल्यांमधील पाणी शेतात साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना राजूभाऊ इंगोले (जिल्हा कार्याध्यक्ष), सिद्धांत गायकवाड (जिल्हा महासचिव), योगेशभाऊ नरवाडे (युवा जिल्हा अध्यक्ष), लखन खंदारे (युवा सहसचिव), रमेश इंगोले (कार्यकर्ते) आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.