पुणे : पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या लोकांची यामुळे तारांबळ उडाली. शहराच्या काही भागांत रिमझिम पाऊस पडत असतानाच, काही ठिकाणी मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
वाहतुकीवर परिणाम आणि यलो अलर्ट
सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक संथ झाली आहे. मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने पुणे शहरासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही काळ असाच पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभर पावसाने दडी मारल्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा पावसाळी दिवसांची आठवण झाली.
ग्रामीण भागातही पावसाची हजेरी
पुणे शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही पावसाची रिपरिप सुरू आहे. भोर, मुळशी, आंबेगाव, शिरूर, जुन्नर, जेजुरी, मावळ यांसारख्या तालुक्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, खडकवासला धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जर हा पाऊस दिवसभर असाच सुरू राहिला, तर धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे बऱ्यापैकी भरली होती, त्यावेळीही पाणी सोडण्यात आले होते.