अकोला : देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी अकोट तालुक्याने राष्ट्रध्वज अभिवादन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला शहरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ झाला. ‘स्वातंत्र्य दिन चुरायू हो’ च्या घोषणांसह देशभक्तीपर गीतांनी अकोट शहरातील प्रमुख भागांतून ही रॅली निघाली. रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच सोमवार वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले. सोमवार वेस येथे रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलताना राजेंद्रभाऊ पातोडे यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १४ ऑगस्टला भारतात तिरंगा रॅली काढणाऱ्या भाजप आणि आरएसएसची खोटी देशभक्ती ओळखली पाहिजे.”
या रॅलीस वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, युवा आघाडी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, युवा तालुका अध्यक्ष आशिष रायबोले, तालुका महासचिव अमन गवई, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या रॅलीच्या यशस्वी आयोजनात वंचित बहुजन युवा आघाडी अकोटच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.