पुणे: पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणाऱ्या औद्योगिक द्रुतगती महामार्गासाठी 28 हजार 429 कोटींचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक दरम्यानचा प्रवासाचा वेळ 5 तासांवरून केवळ 3 तासांवर येणार आहे. ज्यामुळे या प्रदेशाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गा फेब्रुवारी 2024 मध्येच शासनाने मान्यता दिली होती.
हा महामार्ग 133 किलोमीटर लांबीचा असून, तो सुरत-चेन्नई महामार्गाला जोडला जाईल, ज्यामुळे इतर राज्यांतील वाहनचालकांनाही फायदा होईल. सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अहवाल आधीच तयार करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केले आहेत.
नद्या आणि नाल्यांवरून 12 मोठे उड्डाणपूल बांधले जातील. चिंबळी, चाकण, पाबळ (पुणे जिल्हा); राजुरी, खंडारमाळ, साकूर, माची, कासारे (अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील) या महत्त्वाच्या 9 ठिकाणी इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरतील.
प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹28,429 कोटी आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होईल. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 1545 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांचा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचा समावेश असेल.