नागपूर: पुणे येथून नागपूरकडे येत असताना समृद्धी महामार्गावर काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील जयस्वाल कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
कार चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते.
पुण्याहून नागपूरच्या उमरेडला परत येत असताना, समृद्धी महामार्गावरील वनोजा-कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक २१५ येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात घडला.
या अपघातात वैदेही जयस्वाल (२५), माधुरी जयस्वाल (५२), राधेश्याम जयस्वाल (६७) आणि संगीता जयस्वाल (५५) या चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला.
कार चालक चेतन हेलगे (२५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मंगरुळपिर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने उमरेड आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...
Read moreDetails