कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील १५ ते २० घरांच्या वस्तीवर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे एका आजारी आजीला चिखलातून बैलगाडीतून रुग्णालयात न्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
बड्याचीवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या या वस्तीवर जवळपास ४० ते ५० मतदार वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, ज्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मागे घेतला होता. मात्र, निवडणूक संपताच प्रशासनाने सोयीस्कररित्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी एका गर्भवती महिलेलाही याच रस्त्यातून रुग्णालयात न्यावे लागले होते. आता आजीची तब्येत बिघडल्याने त्यांना बैलगाडीतून चिखलातून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.