मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेवर (BNS) जोरदार टीका केली आहे.
भारतीय दंड संहितेची (IPC) नक्कल करून केवळ कायद्याचे नाव बदलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. परभणी येथे कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी लढत असल्याचे सांगत, आंबेडकरांनी कोठडीतील मृत्यूसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद भारतीय न्याय संहितेत नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “काय बदललं आहे तुम्ही,अमित शाह तुम्ही भारतीय दंड संहितेची (IPC) नक्कल केली आणि त्याऐवजी भारतीय न्याय संहिता (BNS) लागू केली. जर तुम्ही खरोखरच न्याय सुलभ केला असेल, तर हिरासततील मृत्यूसाठी शिक्षेची कोणतीही तरतूद किंवा कायदा का नाही?!” आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी लढत असल्याचे नमूद केले, “मी सोमनाथ सूर्यवंशी – वडार समाजातील एक भीम सैनिक – यांच्यासाठी न्यायाची लढाई लढत आहे,
ज्यांचा परभणी येथे कोठडीत छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाला.” त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, न्यायालयात त्यांनी अशा कायद्याची मागणी केली आहे, ज्याचा उद्देश कोठडीतील मृत्यू आणि छळ थांबवणे, जबाबदार व्यक्तींना जबाबदार धरणे आणि पीडितांना भरपाई प्रदान करणे हा आहे. ट्विटच्या शेवटी, प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे, “अमित शाह, तुम्ही लोकांनी काहीही बदललेले नाही!” या टीकेमुळे भारतीय न्याय संहिता आणि त्यातील तरतुदींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांवर गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.