ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रशासनात द्वेषाची भावना असणे गंभीर
मुंबई : बीड, परभणी, लातूर येथील घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. पण जेवढ्या गांभीर्याने या घटना घ्यायला हव्यात तेवढ्या गांभीर्याने सरकार घेताना दिसत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माऊली सोट यांना नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. फिर्याद दाखल करूनही दोन दिवस पोलिस त्याला बघायलाही आले नाहीत. त्याचे कपडे हॉस्पिटल स्टाफने कुठे ठेवले, कसे ठेवले याबाबत मी जायच्या आधी पोलिसांनी चौकशी केली नाही. माऊली सोट हत्याप्रकरणी डॉक्टरांची साक्ष घ्यायला पाहिजे होती. माऊलीच्या अंगावरील जखमांचे स्वरूप काय आहे. ती सुद्धा साक्ष घेतली गेली नाही.
ज्या पद्धतीने माऊली सोट यांना घरी बोलावून मारण्यात आले आहे. हे एक प्रकारे ऑनर किलिंग आहे. स्व -जातीच्या वर्चस्वाच्या भावनेतून त्याला मारण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदार किंवा खासदारांनी त्या कुटुंबाला भेट दिली नाही. तेथील आमदार किंवा खासदारांनी पीडीत कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत करावी, अशी विनंती ॲड. आंबेडकरांनी राजकीय पक्षांना केली आहे.
तसेच, एससी, एसटी अत्याचाराच्या संदर्भातील जो जीआर काढण्यात आला, तो जसाच्या तसा या ऑनर किलिंगच्या घटनेला लागू करावा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच साह्य ऑनर किलिंग प्रकरणात दिले गेले पाहिजे अशीही विनंती ॲड. आंबेडकरांनी शासनाला केली आहे.
गृहमंत्रालय किंवा पोलीस प्रशासन यांच्यात हळूहळू द्वेषाची भावना वाढत आहे असे मला दिसत आहे. हे सगळ्यात वाईट आहे. प्रशासनात जातीचे विष पसरायला लागले आहे. ही चांगली गोष्ट नसल्याची खंत आंबेडकरांनी व्यक्त केली.