मुंबई : बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू पाहत आहात, हे लोकांना कळते, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे एकदा कायदा विभागाला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे, जनता आपल्याला वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा नवीन प्रकार आहे की, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करायचे आणि कोणाला नापास करायचे.
70 च्या दशकात तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटताना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की 3-4 प्रयत्न करायला लावायचे. ही तीच पद्धत नव्याने आणत आहात, असेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.