मुंबई : वंचित, शोषित आणि बहुजन समाज घटकांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर सातत्याने प्रयत्न करत आहेत. ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले होते की, किमान ३ अल्पसंख्याक उमेदवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून असावेत. पण, त्यांनी याच्या पुढे जात ४ अल्पसंख्याक उमेदवार दिले असून, यामध्ये ३ मुस्लिम आणि एक जैन समाजातील उमेदवार दिले आहेत. यामध्ये औरंगाबादमधून अफसर खान, उत्तर मध्य मुंबईमधून अबुल हसन खान, धुळ्यातून अब्दुर रहेमान आणि हातकणंगलेतून दादासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नांदेड, परभणी, औरंगाबाद, पुणे, शिरूर येथून अनुक्रमे अविनाश भोसीकर, बाबासाहेब भुजंगराव उगले, अफसर खान, वसंत मोरे, मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी उमेदवारी यादी मंगळवारी जाहीर केली. त्यामध्ये लोकसभेचे आणखी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.