ॲड. प्रकाश आंबेडकरांची घटनास्थळी भेट !
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 7 मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याचीही माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, “कमानीच्या संदर्भात गावात ठराव झाल्यानंतर अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर हे असं होतंय तर याच्यामागे राजकारण आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आम्हाला त्या राजकाणाचा भाग व्हायचं नाहीये. गावात आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहायला हवी.”
आंबेडकर पुढे म्हणाले, “दोन्ही गटांमध्ये काही निर्णय न होता डीपीडीसीमध्ये तो व्हावा आणि ती कमान शासनच बांधेल असं व्हावं, असं मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय. कालच्या मोर्चात गावातले किती आणि बाहेरचे किती लोक होते, हाही अँगल तपासावा अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
“हे लोकसभा निवडणूक बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरुपात केलेलं आहे का? ते नेमकं कुणी केलंय? ते मी शोधून काढायला सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण गढूळ व्हावं, यासाठी यात कुणाची भूमिका आहे का? हे तपासायला हवं.”