ॲड. प्रकाश आंबेडकर : राजकीय न्याय हक्क निर्धार सभेत घणाघात
इचलकरंजी : एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करणारे काँग्रेसवाल्यांनी सांगावं की, काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर ईडी चौकशी आहे की नाही. ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. ते आम्हाला शहाणपणा शिकवायला निघाले आहे. तुम्ही निवडणूक लढवू नका, आम्ही भाजपला झोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ते इचलकरंजी येथील राजकीय न्याय हक्क निर्धार सभेत बोलत होते.
काँग्रेसला नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही. जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही, पण घराणेशाही यांना पोसायची आहे. याचाच फायदा नरेंद्र मोदी घेतात, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.
मी इथल्या सनातन्यांना विचारत आहे की, इथे कुटुंब व्यवस्थेची मांडणी केलीय की नाही. तुम्ही सगळ्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती स्वीकारायला सांगता, या कुटुंबात एकत्र राहिले पाहिजे हे शिकवता, हे मोदीना का नाही शिकवत एवढं आम्हाला सांगा. सनातनवाल्यांनो, तुम्ही कुठल्या तोंडाने मतदान मागणार आहात ? यांचे बोलणे एक आहे आणि वागणं एक आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, मी काँग्रेसवाल्यांना कार्यक्रम सुचवला आहे की, पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणे द्यावे आणि त्यांना एवढं विचारावं की, तुम्ही हिंदू धर्माचे प्रचारक आहात. हिंदूंनी एकत्र आले पाहिजे असे तुम्ही म्हणता आधी तुम्ही तुमच्यापासून सुरू करा, आणि पती – पत्नी एकत्र रहा.
काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारीबाज आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सल्ला आहे की, अशा सुपारीबाजांना काँग्रेसमधून काढून टाका, तुमची काँग्रेस आपोआप वाढायला सुरुवात होईल, असेही आंबेडकर म्हणाले.
मोदी सरकारची पोलखोल करताना आंबेडकर म्हणाले, मोदी सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात 135 राफेल विमाने फ्रेंचकडून विकत घ्यायची होती, पण मध्यंतरी आपण बातमी ऐकली असेल की, रशियाकडून मिग -२१ आता चालणार नाही. सनातनवाल्यांनो मी तुम्हाला विचारतो की, किती राफेल आले ते सांगा आणि किती येणार तेही सांगा? तसेच, एअरफोर्सचे एक क्वॉर्डन उभा करण्यासाठी 135 फायटर जेट लागतात. यांनी 35 आणले मग 100 फायटर जेट कुठे आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसवाल्यांनो तुम्ही भुरटे चोर आहात, याची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील, पण हा जो डाकू बसलेला आहे, हे सरकार डाकूंचे सरकार आहे. याने दहा वर्षांत 100 पैकी जे 24 रुपये कर्ज होते, या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले, हे लक्षात घ्या. एका बाजूला कारखाने बुडत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला देशातील कर्ज वाढत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर म्हणाले, आपल्या हातात पैसा नसेल, तर आपण काय करतो, घरातील पुरुष काय करतो, तर भांडी विकायला सुरुवात करतो आणि ते संपलं की, घरातील फर्निचर, ते संपलं की घर आणि त्यानंतर रस्त्यावर अशी अवस्था आपल्याला भारतात करायची आहे का? हे ठरवा.