मुंबई: छ. शिवाजी महाराजांच्या काळापासुन राहिलेले मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. निजामी मराठा (सत्ताधारी मराठा) जे मोगलांबरोबर राहिले आणि आता जे आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधले मराठे छ. शिवाजी महाराजांबरोबर राहिले आहेत. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वाक्य फार बोलके आहे. त्यांनी असं म्हटले की, आम्ही कुणबी समाजाच्या संदर्भात निर्णय घेतलाय. मराठा समाजाचा निर्णय शिंदे कमिशनमार्फत आल्यानंतर घ्यावा लागेल. असं वक्तव्य मी ऐकलं आहे. ते जर खरे असेल, तर कुणबी हा अगोदरच ओबीसीमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच म्हटलेलं आहे की, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी आहेत, त्यांना ही ग्राह्य धरावे आणि मुख्यमंत्र्यांनी जीआरमध्ये तसे नमूद केलेले आहे. अजून तो प्रश्न फायनल झाला नाही. कारण १६ तारखेपर्यंत त्यावर हरकती मागवल्या आहेत. त्याची सुनावणी होईल आणि त्यानंतरच तो जीआर फायनल होईल. जरी तो जीआर फायनल झाला, तरी तो कायदेशीर तपासणीमध्ये पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोघलाई मराठे हे रयतेमधल्या मराठ्यांची मुलगी सुंदर असेल तरच करतात. जर एखाद्या रयतेतल्या (गरिब) मराठा मुलांने निजामी मराठ्याच्या (श्रीमंत) मुलीशी लग्न करायचं ठरवले, तर त्याला ठामपणे विरोध होतो. त्यामुळे मराठा समाजात हे सामाजिक आतंरसंबध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष होत आहे. त्यावर त्यांनी हे स्पष्ट केले की, दोन्ही समाजाचे ताट शांतपणे सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत वेगळे करता येईल. शासनाने काढलेला डेटा हा कोर्टात टिकणार नाही. हा फसवेगिरीचा प्रकार आहे आणि तो भाजप करत आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत भाष्य केले.