शासकीय क्रीडा संकुल मध्ये जीवघेण्या नियोजनामुळे अनेक नागरिक जखमी !
अकोला : नमो चषक नावाने भाजप द्वारे शासकीय क्रीडा संकुल मध्ये जीवघेण्या नियोजन मुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून आयोजकांवर गुन्हे दाखल करून नागरिकाच्या उपचाराचा खर्च भाजप कडून वसूल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
नमो चषकाचे नावे संपूर्ण राज्यात २८८ मतदार संघात भाजपने क्रीडा विभागाचा गैरवापर करीत राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार करायला क्रिडा संकुल मध्ये स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याच आयोजना अंतर्गत दगडपारवा येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते नमो चषक स्पर्धा सुरू झाली होती. यासाठी दगडपारवा येथे धोकादायक पद्धतीची प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती.सदर गॅलरी कोसळून १५ नागरिक गंभीर जखमी झाले असून ५० पेक्षा अधिक नागरिकांना दुखापत झाली असल्याची त्यांनी माहिती दिली.
गचाळ नियोजनामुळे मनागरिकांना नाहक जायबंदी व्हावे लागले असून ह्या प्रकरणी आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि जखमीच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई भाजप कडून वसूल करण्यात यावी. तसेच इतर राजकीय पक्षाचे कार्यक्रम करायला अडवणूक करणारे आणि भाजप साठी शासकीय मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देणारे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट यांची चौकशी करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.