मुंबई : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे १०० झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी झोपडीधारकांना दिलासा देत एकाही नागरिकाचे घर निष्कासित होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
कुर्ला ते ट्रॉम्बे विभागातील रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या झोपडीधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर प्रभादेवी परिसरातील नागरिकांनी आज राजगृह येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या घरांवर कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकीत रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या झोपडीधारकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशीही या विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती ॲड. आंबेडकर यांनी दिली. याच चर्चेतील मुद्द्यांच्या आधारे प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील झोपडीधारकांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून, नागरिकांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
