नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये अद्यापही चकमकी आणि संघर्ष सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी हा खुलासा केला असून, यामुळे सीमाभागातील सुरक्षा व तणावाची परिस्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
सीमाभागातील या घडामोडींवर प्रकाश टाकताना परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, चिनी सैन्याकडून ठरवून दिलेल्या गस्त घालण्याच्या (Patrolling) पद्धतींचे व नियमांचे वारंवार उल्लंघन केले जाते, ज्यामुळे सीमेवरील तणाव वेळोवेळी वाढतो. यापूर्वी अरुणाचल प्रदेशमधील तकसिंग परिसरात भारतीय जवान आणि चिनी सैनिक आमनेसामने आल्याच्या काही घटना घडल्या होत्या. या घडामोडींनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सप्टेंबर महिन्यात वाचा-दमाई येथे दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चाही पार पडली होती. (india china military clashe)
मात्र, लष्करी पातळीवर वाटाघाटी होऊनही सीमेवरील संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाही आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चकमकी सुरूच असल्याचे आयटीबीपीच्या महासंचालकांनी उघड केल्याने सीमा भागातील सुरक्षा व्यवस्थेची चिंता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.






