नाशिक : नाशिकच्या राजकीय पटलावर आज मोठी राजकीय घडामोड घडली. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा जाहीर केला. साहिल सोनवणे यांच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात आझाद समाज पार्टीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजीनामा देण्यामागे कोणावरही नाराजी नसल्याचे स्पष्ट करत साहिल सोनवणे म्हणाले, “राजीनामा देण्यामागे कोणतेही वैयक्तिक कारण नाही. मी कोणावरही नाराज नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करत आहे. या लढ्याला अधिक बळकटी मिळावी, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला आहे.”
साहिल सोनवणे यांच्या निर्णयाचे स्वागत करत वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, साहिल सोनवणे हे एकटे पक्षात येत नसून निफाड, दिंडोरी, देवळा आणि सुरगाणा तालुक्यांतील कार्यकारिणी सदस्य तसेच शाखा पदाधिकारीही वंचित बहुजन आघाडीत सहभागी होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष दिनेश जाधव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दिंडोरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, दिंडोरी युवक तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, शहर महासचिव हर्षल जाधव आणि सदस्य ओम पिशवे उपस्थित होते.
यावेळी आझाद समाज पार्टीचे निफाड तालुकाध्यक्ष मज्जू शेख, दिंडोरी तालुकाध्यक्ष वैभव शार्दूल, वसीम शेख, जाहीर पठाण, प्रमोद गांगुर्डे, सनी शार्दूल, वैभव सोनवणे, ॲड. अतुल दोंदे, अरमान पटेल, इम्रान अन्सारी, संजय बसते, मनोज सोनवणे, रोशन अहिरे, फैजान मणियार, विवेक बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





