नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे आणि प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर निवेदन सादर करून प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व जलदगतीने पूर्ण करावा, उपलब्ध पुरावे सुरक्षितपणे संकलित करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करावे, तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबाला आवश्यक वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर व शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली.
सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच पीडित कुटुंबाच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
पीडित कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आरोपीविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेत आरोप सिद्ध झाल्यास लागू कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रभावी कायदेशीर पाठपुरावा करावा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.
यावेळी फारुक अहमद, गोविंद दळवी, शिवाभाऊ नरगंले, शंकर महाजन, दीपक मगर, ॲड. शेख बिलाल, रिझवान शेख, गोपालसिंग टाक, गजानन चिंतले, शिवा शिवशट्टे आदी उपस्थित होते. “पीडित बालिकेला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी भूमिका शिष्टमंडळाने व्यक्त केली.





