अमरावती: तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना खरमरीत निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रशासनाविरोधात गावकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ उभारण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात तालुक्यातील ढासळलेल्या नागरी सुविधांवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. दापोरी येथील बंद असलेला आर.ओ. वॉटर प्लांट तात्काळ सुरू करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांवर पसरलेले चिखलाचे साम्राज्य दूर करून स्वच्छता मोहीम राबवावी आणि पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात धूर फवारणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
‘एक वर्षातच पूल खचला; चौकशी करा!’
वरूडा येथील अनुसूचित जाती वस्तीतील पूल बांधणीनंतर अवघ्या एकाच वर्षात खचून गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सिद्धार्थ कटारने, भुजंग वावरे, अनिल गाडगे, श्रीकृष्ण वावरे, सचिन बाखडे, अभिषेक मनोहरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






