सोलापूर : द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने, संस्थापकाध्यक्ष बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित ‘गाव तेथे शाखा, घर तिथे सैनिक’ या संकल्पनेनुसार मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहार येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्यालयीन अध्यक्ष तथा समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या सूचनेनुसार हे सर्व कार्यक्रम पार पडले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर जय भीम बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा संघटक कैलास सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर लोकशाहीर, कवी व गायक वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमृतानंद सोनवणे यांनी भूषवले, तर मांडेगावचे ग्रामसेवक आकाश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जय भीम बुद्ध विहाराच्या वतीने देवदत्त मिरगणे यांना वृक्षाचे वाटप करण्यात आले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पेन आणि खाऊचे वाटप करून प्रोत्साहित करण्यात आले.
Also Read : परभणीत संतापजनक घटना! ऑटो लावण्यावरून भाजी विक्रेत्याला मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी
या प्रसंगी जय भीम बुद्ध विहार मांडेगाव कार्यकारिणीचे अध्यक्ष रामभाऊ सोनवणे, सरचिटणीस कैलास सोनवणे, कार्यालयीन सचिव अमृतानंद सोनवणे आणि हिशोब तपासणीस रणजीत सोनवणे उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्षा मंगल सोनवणे, उपाध्यक्षा रेखा सोनवणे, समता सैनिक दलाचे सैनिक गणेश चव्हाण, रमेश सोनवणे, माणिक सोनवणे, प्रमिला सोनवणे, मनीषा सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मांडेगाव येथे १५ ऑगस्ट रोजी होणारी महत्त्वाची ग्रामसभा पार पडली नाही. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट अशा महत्त्वाच्या दिवशी ग्रामसभा न झाल्याने सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न आणि हक्क मांडण्यापासून डावलले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






