नांदेड: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर सध्या महाराष्ट्रभर फिरून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत. या संवाद दौऱ्याचा एक भाग म्हणून नुकतीच नांदेड येथे ‘कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक’ उत्साहात पार पडली.
या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सामान्य जनतेमध्ये वाढलेली विश्वसनीयता आणि पक्षात येणाऱ्या लोकांचा वाढता कल यावर सखोल चर्चा झाली. पक्षाने आतापर्यंत विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी उभारलेले लढे, तसेच भ्रष्टाचार, अन्याय व अत्याचाराविरोधात घेतलेली ठाम भूमिका तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचवायची, या संदर्भातील सखोल चर्चा या बैठकीत झाली.
Also Read : नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार
याशिवाय, राज्यातील ऐरणीवर आलेला पेपरफुटीचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांच्या इतर अडचणी; ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाने केलेल्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण संवाद बैठकीस सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते कैलास वाघमारे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






