औरंगाबाद : खुलताबाद रस्त्यावर असलेल्या धोकादायक दुभाजकामुळे सातत्याने अपघात होत असून, वारंवार अपघात होऊनही हा दुभाजक हटविण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (ता. ८) अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दुभाजकाचा प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’ करून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष रंगनाथ भुर्जेळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खुलताबाद रस्त्यावरील सदर धोकादायक दुभाजकाला पुष्पहार अर्पण केला. तसेच या दुभाजकामुळे आतापर्यंत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा दुभाजक वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. दुभाजकावर पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना, प्रतिबिंबित पट्टे अथवा योग्य प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून, काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
दुभाजकाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलेल्या या प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’ आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. धोकादायक दुभाजक तातडीने हटवावा किंवा त्याठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.






