साकोली: दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानुसार साकोली शहर सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता साकोली बस स्टॉपच्या समोरून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वांच्या हातात तिरंगी झेंडे घेऊन निघालेला हा मोर्चा बस स्टॉपच्या समोरून नागझिरा येथील चौकासमोरील शाळेमार्गे, तसेच पोलीस स्टेशन मार्ग आणि लाखांदूर रोडने जुन्या तहसील ऑफिससमोर पोहोचला, जिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
या सभेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पेपर फुटी प्रकरणात ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात यावी, २० जुलै रोजी झालेल्या लाठीमार प्रकरणात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत देण्यात यावी व लाठीमार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत (एसडीओ) सरकारकडे पाठवण्यात आले.
या सभेत वंचित बहुजन महिला आघाडीच्या भंडारा जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, काँग्रेसचे अशोक कापगते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी. जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, कैलास गेडाम, विलास मेश्राम, बसपाचे बिट्टू गजभिये, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे शिवकुमार गणवीर, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, शब्बीर पठाण, काँग्रेसचे लालू करंजीकर आणि जनजागरण कलावंत संघटनेचे भावेश कोठांगले यांची भाषणे झाली.
शासनाला दिलेल्या या निवेदनावर काँग्रेसचे अशोक कापगते, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे शिवकुमार गणवीर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे किशोर चन्ने, प्रमोद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम, अचल मेश्राम, वंचितचे डी. जी. रंगारी, वंचित जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, अमित नागदेवे, भावेश कोठांगले, समता सैनिक दलाच्या प्रमिला टेंभुरकर आणि महामाया महिला संघटनेच्या शितल नागदेवे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या मोर्चात सभापती शीतल राऊत, माजी सभापती मदत रामटेके यांच्यासह इतर सर्व पक्षांतील व सामाजिक क्षेत्रातील, तसेच सामाजिक संघटनांतील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




