गरीब मराठ्यांना श्रीमंत मराठ्यांनी लुटले अशी परिस्थिती आहे. श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. त्यांना केवळ लाचार मराठा हवा आहे. त्याला आरक्षण दिले तर उंबरठा झिजवणारा मराठा कसा शिल्लक राहील. त्यामुळे आता गरीब मराठ्यांनी ठरवायचं आहे त्यांना त्यांच्या कोशातून बाहेर पडायचं आहे का? त्यांना फसवणारा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपही आहे. गरीब मराठा जोपर्यंत इतर पक्षांकडे बघायला तयार होत नाही, की जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत, तोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही. सेनेला आरक्षणाचं काही घेणं देणं नाही. बीजेपी सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ श्रीमंत मराठ्यांच्या बाजूची आहे.
गरीब मराठा जोपर्यंत सामाजिक आणि राजकीय आयडेन्टिटी निर्माण करीत नाही, तोपर्यंत गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी. आतापर्यंत श्रीमंत मराठ्यांचाच उदोउदो झाला, गरीब मराठ्यांना काहीच दिलं नाही. गरीब मराठ्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली पाहिजे. तेव्हा कुठे त्याला न्याय मिळेल. कोर्टानं दोन गोष्टी याआधीच स्पष्ट केल्या आहेत. एक म्हणजे ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नाही, आणि दुसरं तुम्हाला कुणाला आरक्षण द्यायचं असेल, तर ओबीसी कमिशनमार्फत द्या असं म्हटलं आहे. या सरकारनं तर कमिशनलाच आव्हान दिलं आहे. कोर्ट म्हणतयं की मग आम्ही ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्यालाच तुम्ही आव्हान देणार असाल तर ते ढोंगी आहेत.
गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, याच मताचे आम्ही आहोत. मात्र, त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या कोशातून बाहेर पडावं. गरीब मराठ्याची वागणूक बघितली तर तो आजही श्रीमंत मराठ्याच्याच पाठीमागे आहे. आरक्षण की जात असं जर आलं तर तो जात पकडतो, तो आरक्षण पकडतच नाही. गरीब मराठा तरुणांचं भवितव्यच अंधारात टाकलं आहे. पण या गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांना आमचं भविष्य अंधारात का टाकलं हे विचारायला पाहिजे. गरीब मराठा तरुणांच्या आयुष्यात ज्या श्रीमंत मराठ्यांमुळे अंधार पसरला आहे, आमचा रस्ता का बंद केला म्हणून गरीब मराठा तरुणांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे मागितले पाहिजेत. आता गरीब मराठा तरुण काय भूमिका घेतात, हे बघितलं पाहिजे. श्रीमंत मराठ्यांच्या कोशातून बाहेर पडून गरीब मराठ्यांनी आरक्षणाच्या बाजूने असलेल्या पक्षांसोबत राहिले पाहिजे. तसेच ज्या श्रीमंत मराठ्यांनी त्यांना फसवले आहे, त्यांचे राजीनामे मागून आपले अस्तित्व दाखवले पाहिजे.