वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने अकोल्यात लवकरच (Pressure Swing Absorption) पीएसए प्रणालीवर चालणारा ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा खूप मोठि आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अश्या परिस्थितीत अकोल्यात ऑक्सिजन प्लांट सुरु झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे.
वंचितचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी हवेतून प्राणवायू वेगळा करून त्याला शुद्ध स्वरूपात रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट सुरु करावा असा प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने ऍड.आंबेडकरांचा हा प्रस्ताव मान्य केला आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन फुंडकर यांनी दिली आहे. सदर प्रस्ताव मान्य करण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर, उपजिल्ह्याधिकारी संजय खडसे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे वंचित बहुजन आघाडी तर्फे आभार मानण्यात आले आहेत.
अकोला जिल्हापरिषदेत सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा जिल्हापरिषदे तर्फे ५० बेडचे कोविड सेंटर उभारून कोरोना विरुद्धच्या लढाईत स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा मोठा हातभार लावू शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे. कोविड सेंटर पाठोपाठ आता ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी पुढाकार घेऊन वंचितने जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहोत हे दाखवून दिले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि आघाडीचे नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे पाहून इतरही पक्षांनी अश्याच प्रकारे कोविडशी लढण्यासाठी प्रकल्प उभे केल्यास लवकरात लवकर कोरोनावर मात करता येईल.