Mumbai-Goa Highway Accident : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असतानाच रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत शुक्रवारी पहाटे आणखी एक भीषण दुर्घटना घडली. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा चालकावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली आणि या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 38 प्रवासी जखमी झाले.
अपघात इतका गंभीर होता की काही प्रवासी बसमध्येच अडकले. त्यामध्ये एका महिलेला बसखाली अडकलेल्या अवस्थेतून मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. पोलिस, स्थानिक नागरिक आणि SVRSS बचाव पथक यांनी तत्परतेने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले.
जखमींपैकी आठ ते नऊ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना नवी मुंबई आणि मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. काही जखमींवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसही तातडीने दाखल झाले आणि बचावकार्याला वेग आला. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तांत्रिक बिघाड किंवा इतर शक्यतांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.






