नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 19 मार्च 2026 रोजी केलेल्या ट्विटमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, सोमवार 23 मार्च रोजी नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयासमोर शांततापूर्ण आणि अमनपसंत जनप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीबरोबरच भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पार्टी यांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंबेडकर यांनी सांगितले की, त्यांनी आणि हर्षसपकळ यांनी संयुक्तपणे डॉ. मोहन भागवत यांना पत्राद्वारे या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे.
पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की, सामान्यतः भारतीय कायद्यांनुसार नोंदणीकृत नसलेल्या संस्थांना पत्र लिहिण्याची पद्धत नसते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, संघाच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांनी आपला प्रोटोकॉल मोडत हे पत्र लिहिले आहे. संघाने मोदी यांना सध्याच्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात भूमिका बजावली असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मागणे हा आहे. आंबेडकर यांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
– नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाइल्सशी संबंधित ईमेलमध्ये समोर आल्यानंतर आरएसएस का शांत आहे?
– अमेरिकेसोबत राष्ट्रहिताच्या विरोधात व्यापार करार केल्यावर संघाने प्रतिक्रिया का दिली नाही?
– राफेल लढाऊ विमानांची खरेदी करताना सोर्स कोड न घेता व्यवहार का करण्यात आला, आणि यावर आरएसएस मौन का बाळगते?
– नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्पष्टपणे तडजोडीचे (कंप्रोमाइज्ड) असल्याचे दिसत असताना संघ गप्प का आहे?
– देशाची सार्वभौमता, धोरणनिर्मिती स्वातंत्र्य आणि सुरक्षा धोक्यात येत असताना आरएसएसची भूमिका काय आहे? या सर्व बाबींमध्ये संघ सहभागी आहे का?
– भारत पुन्हा बाह्य शक्तींच्या प्रभावाखाली जाण्याच्या उंबरठ्यावर असताना संघाची शांतता का कायम आहे?
हे सर्व प्रश्न 23 मार्च रोजी नागपुरातील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान आरएसएससमोर उपस्थित केले जाणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे संघाने देशासमोर मांडावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.





