चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतात साचणारे दूषित पाणी, पिकांचे प्रचंड नुकसान, जमिनीची उत्पादकता घटणे आणि आर्थिक तोटा यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.
या गंभीर प्रश्नावर वंचितचे सिद्धांत पुणेकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. WCL ने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतात सोडण्यात येणारे वेस्ट वॉटर दुसरीकडे वळवावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. या पाठपुराव्याची दखल घेत बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली व समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. (Chandrapur news)
सिद्धांत पुणेकर यांनी इशारा दिला की, “जर एका आठवड्यात प्रश्न निकाली निघाला नाही, तर सर्व बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.” या ठाम भूमिकेनंतर WCL प्रशासनाने चार वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, मागील चार वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची पूर्ण नुकसान भरपाई मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरूच राहणार आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. (Chandrapur news)
यावेळी वंचितचे आशिष तितरे, नांदगावचे माजी ग्राम पंचायत सदस्य सुनील शेंडे, विसापूरचे माजी ग्राम पंचायत सदस्य गजानन पाटणकर, सचिन जमदाडे, मुलचंद वनकर, शुभम येरगुडे, अविनाश टोंगे, देविदास हरणे व समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.





