मुंबई : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या जाहीर सभांनी राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ४ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या दहा दिवसांच्या कालावधीत वंचित बहुजन आघाडीने उभारलेला प्रचाराचा झंझावात पाहता, या निवडणुकीत पक्ष निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. विविध महानगरांमध्ये उसळलेला जनसागर आणि मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीमुळे वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. सभास्थळी उपस्थित नागरिकांमधूनही पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा असल्याच्या भावना व्यक्त होत होत्या.
या दहा दिवसांच्या कालावधीत पक्षाच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांभाळली. तरुणांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांनी अत्यंत व्यापक आणि आक्रमक प्रचार केला. आकडेवारीवर नजर टाकल्यास, सुजात आंबेडकर यांनी एकूण ३४ जाहीर सभा घेतल्या असून १८ पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला. याशिवाय त्यांनी ८ कॉर्नर सभांमधून स्थानिक प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधत प्रचार अधिक प्रभावी केला. त्यांच्या प्रत्येक सभेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनीही या कालावधीत राज्यातील विविध महानगरांचा दौरा करत २२ भव्य जाहीर सभांना संबोधित केले. त्यांच्या सभांना होत असलेली प्रचंड गर्दी पाहता, वंचित बहुजन आघाडी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकेल, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे. प्रत्येक सभेत नागरिकांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पक्षाच्या प्रचारात नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचाही सहभाग लक्षणीय ठरला. त्यांनी २४ जाहीर सभा घेतल्या असून, १ पदयात्रा आणि ३ कॉर्नर सभांच्या माध्यमातून महिलांपर्यंत आणि कुटुंबांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे पोहोचवली. त्यांच्या सभांबाबत सर्वत्र सकारात्मक चर्चा रंगताना दिसत आहे.
केवळ प्रमुख नेतेच नव्हे, तर वंचित बहुजन आघाडीचे विविध प्रवक्तेही या प्रचारकाळात अत्यंत सक्रिय राहिले. पक्षाच्या प्रवक्त्यांनी मिळून ५० पेक्षा अधिक सभा व बैठका घेत विरोधकांवर जोरदार टीका करत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली.
४ ते १३ जानेवारी या कालावधीतील प्रचाराची एकूण आकडेवारी पाहता, वंचित बहुजन आघाडीने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत प्रचारात लक्षणीय आघाडी घेतल्याचे स्पष्ट होते. विशेषतः सुजात आंबेडकर यांच्या सभांची संख्या सर्वाधिक असल्याने तरुण मतदारांवर पक्षाचा विशेष भर असल्याचे अधोरेखित होते. या जाहीर सभांनी महाराष्ट्रभर राजकीय चर्चा तापवल्या असून, अनेक ठिकाणी उसळलेल्या जनसागरामुळे वंचित बहुजन आघाडीचे पारडे यंदाच्या निवडणुकीत जड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






