अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून सर्वत्र पक्षात प्रचाराचा धडाका सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे प्रभाग क्रमांक १८ मध्ये झालेली जाहीर सभा प्रचंड गाजली. या सभेतून आंबेडकरांनी विकासाच्या मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य करत अकोला शहराच्या परिवर्तनाचे आवाहन केले.

बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केवळ राजकारण न करता अकोल्याच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला. त्यांनी प्रामुख्याने शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज, खराब रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून दळणवळण सुधारणे, अकोल्यातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी धोरणात्मक पावले, महापालिका शाळांचा दर्जा उंचावून सामान्य मुलांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आदी प्रश्नावर नागरिकांना संबोधित केले.

जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या जाहीर सभेला अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. सभेला झालेली ही गर्दी म्हणजे अकोला शहरवासीयांनी यंदा ‘वंचित बहुजन आघाडी’ला संधी देण्याचा निर्धाराचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.
“अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भव्य सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले असून, प्रभाग १८ सह संपूर्ण शहरात वंचितची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.






