बीड : बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने आता तीव्र वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या सह-आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.
पीडित कुटुंब शिवाजी नगर पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारूनही त्यांना सहकार्य मिळत नव्हते. अखेर हताश होऊन पीडित मुलीसह तिच्या कुटुंबाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आंबेडकर यांनी तात्काळ तपास अधिकारी डी.वाय.एस.पी. पूजा पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि तपासाबाबत कडक सूचना केल्या.
सह-आरोपींकडून कुटुंबाला धमकावण्याचा प्रकार :
आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने तपास अधिकारी पूजा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुख्य आरोपीसोबतच या गुन्ह्यातील सह-आरोपी कुंडलिक खांडे, गणेश खांडे, अमोल डरपे, गणेश खोड, धोंडीराम खांडे आणि मुख्य आरोपीचे चुलते यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सह-आरोपी पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत असून, तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत घराभोवती चकरा मारत आहेत. यामुळे पीडित कुटुंबात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली किंवा विलंब लावला, त्यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत महिला आयोग, मानवाधिकार आयोग आणि SC/ST आयोगाकडेही दाद मागण्यात येणार आहे.
“जर पोलिसांनी सह-आरोपींना तात्काळ अटक केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
निवेदन देताना पीडित कुटुंबासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरोदे, तालुकाध्यक्ष किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, रोहन मगर, उमेश तुलवे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






