– लेखक सागर भवते
अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता वंचित बहुजन आघाडी व डॉ. अलींम पटेल यांच्या नेतृत्वातील युनायटेड रिपब्लिकन फोरमची राजकीय आघाडी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले. मनाला अत्यंत आनंद देणारी, आणि आगामी काळातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरणारी कालची पत्रकार परिषद म्हणावी लागेल.
डॉ. अलींम पटेल म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणूकित ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी विदर्भासमोर आणलेल एक बहुजनवादी, राष्ट्रप्रेमी आणि जनसमस्यांचा दांडगा अभ्यास असणार एक आंदोलक नाव. याच नावाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांची झोप उडवली होती. आणि मागील वर्षी झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (आझाद समाज पार्टीच्या बॅनर वर ) तर अलींम पटेल यांनी इथे आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना प्रत्येक फेरीत पाणी पाजलं होत. अगदी शेवटच्या दोन फेरीत त्यांचा निसटता पराभव झाला.
उशिरा का होईना परंतु बहुजन नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी राजकीय भूमिकेच्या कायम प्रेमात असलेल्या डॉ. अलींम पटेल यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन बहुजन, आंबेडकरवादी समूहाला सत्तेच्या दालनात पोचविण्याच्या दृष्टीने उचलले सकारात्मक पाऊलच म्हणता येईल.
आलटून पालटून दोन- तीन घराण्याच्या बाहेर न पडणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्तेला आता आंबेडकरी, मुस्लिम समूहातील झोपडीत जाण्याचा मार्ग आजच्या निर्णयाने सुकर झाला आहे असे मला वाटते. या आघाडीच्या राजकीय/सामाजिक प्रवासात ओबीसी, बौद्ध, मुस्लिम, आदिवासी, तथा राजकिय दृष्ट्या दुर्लक्षित घटक मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी असेलच.
भारतीय लोकशाहीला गिळंकृत करू पाहणाऱ्या भाजपा सारख्या राक्षसाचा बिमोड करण्यासाठी संविधानवादी नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका निवडणूक लढत असताना डॉ. अलींम पटेल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता अमरावतीत अकोला पॅटर्न नक्कीच चालणार आणि रुजणार सुद्धा यात शंका नाही. दोस्तहो, राजकारण हे भांडवलंदार, कारखानदार आणि सत्ता भोगलेल्या कुटूंबाच्या इशाऱ्यावर चालले जात असताना गोर गरीब, वंचित, उपेक्षित, जनतेला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे.
अशा स्थितीत साधने अपुरी असतील परंतु प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची प्रचंड जिद्द असलेल्या आपल्या लढाऊ समूहाला या आघाडीच्या निमित्ताने नवे बळ प्राप्त झाले आहे. मायबाप जनतेने आता नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीचा कित्ता गिरवत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचा अकोला पॅटर्न ताकदीने उभा करावा आणि ती सोनेरी संधी या नव्या आघाडीच्या निमित्ताने आपणाला लाभलेली आहे.






