उस्मानाबाद : नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (VBA) प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधून वंचितच्या उमेदवार रिमा ब्रह्मदेव शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवून नव्या इतिहासाची नोंद केली आहे. रिमा शिंदे या धाराशिव जिल्ह्यातून विजयी झालेल्या सर्वात कमी वयाच्या (२५ वर्षे) उमेदवार ठरल्या आहेत.
पहिल्याच प्रयत्नात यशाचे शिखर
केवळ २५ वर्षांच्या असलेल्या रिमा शिंदे यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले होते. वंचित बहुजन आघाडीने विश्वास दाखवत प्रभाग १ मधून उमेदवारी दिली होती.
रिमा यांनी प्रचारादरम्यान जनसामान्यांशी जोडलेला संवाद आणि वंचितांच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका मतदारांना भावली.
प्रस्थापित पक्षांच्या दिग्गज उमेदवारांना मागे टाकत त्यांनी हा विजय संपादन केला आहे.
जिल्ह्यात रिमा शिंदेंच्या विजयाचीच चर्चा आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले असले, तरी सर्वाधिक चर्चा रिमा शिंदे यांच्या विजयाची होत आहे. “तरुणांनी राजकारणात यावे आणि वंचितांचे प्रश्न सोडवावेत,” या ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराला रिमा यांच्या विजयाने बळ मिळाले आहे.
‘वंचित’ची भूममध्ये जोरदार मुसंडी –
भूम नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवून दिली आहे, त्यावरून आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. रिमा शिंदे यांच्या विजयामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





