– प्रा. डॉ किशोर वाघ
आज नगरपंचायती आणि नगरपरिषदांचे निकाल हाती आले आहेत. शहरी भागांसाठी कार्यरत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘ वंचित बहुजन आघाडी ‘ ने आपला राजकीय प्रभाव सिद्ध करत बहुतांशी ठिकाणी आपले खाते उघडले आहे.
बार्शी टाकळी ( अकोला) आणि चांदूर रेल्वे (अमरावती)येथे नगराध्यक्षपदी वंचितचे उमेदवार निवडून आले आहेत.६० हून अधिक निवडून आलेले ‘वंचित ‘चे नगरसेवक हे विविध जात समूहातून आणि वंचित घटकांमधून आलेले आहेत. अर्थात वंचितांच्या हाती सत्ता यायला हवी,हा ‘वंचित ‘ च्या राजकरणाचा मूळ पाया आहे.
त्या दृष्टीनेही या विजयाकडे पाहता येईल.बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत, की ते सातत्याने लोकांच्या प्रश्नांवर लढतांना दिसतात. भाजप/ आरएसएस विरुद्ध आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. अशी हिंमत महाविकास आघाडीतील कोणत्याच घटक पक्षाकडे नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपच्या हाती सत्ता असताना आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना आव्हान देणे ही साधी गोष्ट नाही. सुजात आंबेडकर यांनी ते करून दाखविले आहे.
आधीपासूनच बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील एखाद्या जागे पुरेते मर्यादित नसल्याचे दिसून येते. तर लोकशाहीत निवडणुका लढणे, स्वतः चा मतदार तयार करणे.
मतदारांमध्ये आपलाही एक पक्ष आहे. आपल्या पक्षाचाही उमेदवार निवडून येऊ शकतो. असा विचार,अशी भावना पेरणे महत्वाचे असते. वंचितने जाणीवपूर्वक या गोष्टी केलेल्या आहेत ; किंबहुना ते राजकारणात टिकण्यासाठी आवश्यक ठरते. हेच यातून दिसून येते.’
वंचित ‘ आता पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ताकदीने उतरेल .याची खात्री या निकालाने दिली आहे.






