राज्यभरात वंचित चे 70 हुन अधिक नगरसेवक विजयी!
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निकालांकडे पाहता अतिशय आनंद होत असल्याची भावना पक्षाच्या राज प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने काम केले. या सर्वांच्या प्रयत्नांचे सकारात्मक फळ आज महाराष्ट्रात दिसून येत असून जवळपास 70 हून अधिक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. उर्वरित तपशीलवार माहिती टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दशकांपासून पक्षाचे कार्यकर्ते तळमळीने आणि सातत्याने काम करत असून वंचित बहुजन आघाडी स्वबळावर उभी राहत असल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे. आज मिळालेले यश हे पक्षाचे स्वतःचे यश असून त्यामागे कोणतीही संपत्ती, पैसा किंवा धनदौलत नसून कार्यकर्त्यांच्या मेहनतीची ताकद असल्याचे डॉ. पुंडकर यांनी नमूद केले.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल त्यांनी पक्षातर्फे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले. तसेच विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे त्यांनी अभिनंदन केले.






