परभणी : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्णा शहरात आज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य व प्रचंड शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली. सकाळपासूनच शहरात ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी व निळ्या ध्वजांच्या लाटेमुळे निवडणूक वातावरण रंगतदार बनले होते. रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून विविध समाजघटक, तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे, जिल्हा अध्यक्ष मनोहर वाव्हळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व उमेदवार सहभागी झाले होते. उमेदवारांनी मार्गक्रमणादरम्यान नागरिकांना प्रत्यक्ष भेटत आपल्या पक्षाच्या योजना, स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना तसेच नगरविकासाचे भक्कम दृष्टिकोन जनतेसमोर मांडले.
शहरातील प्रमुख चौक, वस्ती, व्यापारी पट्टे, मुख्य रस्ते यांमधून मार्गक्रमण करत असताना रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीत जिल्हा, तालुका, शहर शाखा तसेच महिला व युवा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.






